अर्थदृष्टी-मानसिक हिशोब मेंटल अकौंटिंग.

माणसाने पैसे देवाण घेवाणी मधील मध्यम म्हणून वापरायला सुरवात केली. पैसे आणि त्या बाबत माणसाची वर्तणूक हा मानसशास्त्रीय अभ्यासाचा एक विषय म्हणून आता समोर येत आहे. रिचर्ड थॅलर ह्या नोबेल पुरस्कारानं गौरवलेल्या अर्थशास्त्र आणि मानसशास्त्र अभ्यासकाने ह्या बाबत बरंच संशोधन केलं आहे. 

 

माणूस पैस्या-पैस्या बाबत कसा फरक करायला लागतो हे समजून घेणे अतिशय रंजक आहे आणि तितकंच महत्वाचेही.

समजा तुम्ही एका कार्यक्रमाला गेलात आणि तिथे तुम्हला बक्षीस म्हणून 500 ₹ ची नोट मिळाली, तर तुम्हाला आनंद होईल पण दुसरी कंडीशन जर तुमची एखाद्या कार्यक्रमात 500 ₹ ची नोट हरवली आहे, तुम्ही खूप उदास होता…..काहीवेळाने कोणीतरी येऊन स्टेजवरन विचारलं की 500 ₹ ची नोट सापडली आहे. कोणाचे पडलेले का?’ तुम्ही लगेच उभं राहून पटवून दिलंत आणि तुम्हाला तुमचे गेलेले 500 ₹ ची नोट परत मिळाली. 

 

कोणत्या बाबतीत जास्त आनंद जास्त झाला असेल? जास्तीत जास्त लोकांना हरवलेले पैसे परत मिळाल्यावर जास्त आनंद होतो! अगदी बक्षीस म्हणून मिळलेल्या पैश्या पेक्षा ही…!

 

हे असे का? वास्तविक दोन्ही 500 रुपयांचा नोटांची वस्तू किंवा सेवा विकत घ्यायची क्षमता तेवढीच आहे तरी आपण पैस्या पैस्यात फरक करायला लागतो…एक मला भेट मिळालेले आणि दुसरे माझे स्वतःचे मेहनतीने कमावलेले.

आता लक्षात येईल वाम मार्गाने आलेले पैसे पटकन खर्च का होतात आणि कशावर खर्च होतात ह्या मागील माणसाची प्रवृत्ती…ही प्रवृत्ती समजून घेतल्यास आपण अश्या प्रवृत्ती पासून स्वतःला दूर ठेवणे जास्त चांगल्या प्रकारे अंगवळणी पडून घेऊ शकतो. त्यासाठी मी इथून पुढे काही उदाहरणे देत काही गोष्टी स्पष्ट करत जाणार आहे.

 

एक कपल अमेरिकेत लास वेगासला फिरायला आणि कासिनोचा अनुभव घ्यायला जातात,ते खेळायला जातात सुरवातीला त्यांना फायदा व्हायला लागतो आणि त्यांचं भान सुटत. ते डाव हरतात, त्यांचे आठ दिवस पुढे राहायचे पैसे ही ते गमावून बसतात! दोघांना फार दुःख होतं. ते गपचूप पॅकिंग करतात आणि उद्या परत जायचं ठरवतात!

रात्री नवर्याला काही झोप लागत नसते त्याचा मनात एक आकडा सारखा येत असतो ’11’ तो फार अस्वस्थ होतो, तो आपले खिसे तपासतो तर  त्याला दहा डॉलर मिळतात तो तसाच त्यांचा हॉटेलच्या कसिनोमध्ये जातो आणि 11 नंबर वर 10 डॉलर खेळतो आणि आश्चर्य म्हणजे तो जिंकतो आणि त्याला 100 डॉलर मिळतात. तो पुन्हा त्याच अकड्याकर लावतो त्याचा नशिबाने त्याला 1 हजार डॉलर मिळतात! 

आता तो 34 आकडा मनात घेतो आणि आश्चर्य म्हणजे तोही आकडा येतो त्याला दहा हजार डॉलर मिळतात असं खेळत – खेळत तो दहा लाख म्हणजे एक मिलीयन डॉलर जिंकतो! आता तो ते एक मिलियन ही लावायला निघाल्यावर कसिनोचा मालक त्याला म्हणतो, आम्ही एक मिलियनच्या वर नाही पैसे लावून घेत, पण आम्ही तुम्हाला आणखी मोठ्या कसिनोत नेऊ शकतो, जिथे तुम्ही इतक्या मोठ्या रकमा लावू शकता.त्याला त्याचे जिंकलेले पैसे दिले जातात. हा म्हणतो न्या मला त्या मोठ्या कासिनो मध्ये! आता त्याला दोन बॉडीगार्ड मर्सिडीजची गाडी, अशा लवा-जमा सकट घेऊन जातात! त्याचं नशीब इतकं फळफळतं की तो एक बिलियन म्हणजे दहा कोटी डॉलर जिंकतो! खूप खुश होतो! पण एक एकडा आणखी त्याचा मनात येतो ’77’ त्याला वाटत एक शेवटचा डाव खेळूया आणि तो त्याचे दहा कोटी डॉलर लावतो…

त्या डावात मात्र आकडा येतो 52! तो जिंकलेले सर्व दहा कोटी डॉलर हरतो. खूप दुःख होते, का मी थांबलो नाही….म्हणून खूप चिडचिड होते. पराभूत मनाने चालत चालत आपल्या हॉटेलवर येतो. आता कोणी बॉडीगार्ड नाही… ना मर्सिडिजची गाडी असते!

तो आत आल्यावर बायकोला आवाज झाल्याने ती उठते आणि विचारते काय झालं कुठे गेलेलास?? 

तो बसतो एक घोट पाणी पितो आणि म्हणतो ”माझ्या पॅन्टच्या खिशात दहा डॉलर मिळालेले ते ही मी हरून आलो!”

 

आता विचार करा तो खरं तर शेवटचा डाव जिंकलेल्या अर्ध्या पैश्यानेही खेळू शकत होता की, अगदी एक लाख डॉलर बाजूला ठेवूनही खेळला असता तरी तो खूप पैसे राखून असता! 

मात्र त्याने उत्तर काय दिलं? की मी गमावलं काय तर माझे दहा डॉलर! ह्याचा अर्थ त्याने ते जिंकलेले पैसे त्याने त्याचे कधी मानलेच न्हवते! जेव्हा आपण एखादी वस्तू किंवा वास्तु गुंतवणूक म्हणून घेतो. समजा सोने ज्यांनी 25 हजारच्या घेतले आणि एक लाख झाल्यावर त्यात 75% प्रॉफिट आहे मी माझे 75% सोन्याला रिटर्न आणि 25% सोन्याला माझी गुंतवणूक अशी विभागणी करतो का? काय म्हणतो आशा वेळी? “ही चेन मी पन्नास हजारात घेतली आता दोन लाखाची झाली.” हा प्लॉट मी 25 लाखात घेतला आता एक कोटीचा झाला. ह्यातला 25 टक्के कॅपिटल आणि 75 टक्के रिटर्न असा भेदभाव आपण फक्त शेअर्सचा किंवा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ मध्ये किंवा आशा प्रकारे केलेल्या जुगारी उद्योगात करतो.

 

ह्या उदाहरणातल्या माणसाने, त्याचे स्वतःचे पैसे मानले कोणते होते तर दहा डॉलर!  मनाची समजूत काय करून घेतली, की मी गमावले किती तर दहा डॉलर! वास्तविक त्याने गमावलेले असतात एक बिलियन डॉलर!

 

माणूस हे जे काही पैस्या-पैस्यात फरक करतो, ह्यालाच म्हणतात मेंटल अकौंटिंग म्हणजेच मानसिक हिशोब!  हा मानसिक हिशोब सोने, रियल इस्टेट ह्या बाबत होत नाही म्हणून त्यात केल्या गेलेल्या गुंतवणुकीत जास्तीत जास्त लोक यशस्वी झालेले दिसतात.

आपण आपल्या रोजच्या आयुष्यात असा मानसिक हिशेब अनेकवेळा करत असतो आणि गुंतवणुका बाबत तर हे मानसिक हिशोबीपण अधिकच काम करत असते.

समजा तुम्ही प्रत्येकी एक लाख रुपये दोन वेग वेग वेगळ्या फंडात गुंतवलेले आहेत. दोन वर्षाने तुम्हाला पंचवीस हजार रुपायची गरज असते तुम्ही पाहता एका लाखाच्या गुंतवणुकीचे झालेत एक लाख पंचवीस हजार आणि दुसऱ्या गुंतवणुकीतील एक लाखाचे झाले आहेत ७५ हजार! तुमचे गुंतवलेले दोन लाख आहेत तसेच आहेत!

 

आता तुम्ही 25 हजार कशातून काढायला पहाल? 

 

सामान्य गुंतवणूकदार जास्तीतजास्त शक्यता आहे की ते एक लाख पंचवीस हजार झालेत त्यातूनच पंचवीस हजार काढेल! का कारण हे वाढलेले पंचवीस हजार तर त्यांनी त्यांचे मानलेच न्हवते! ते तर बाजार भाव वाढल्याने त्यांना मिळालेत. तेव्हा ते पहिले वापरून घेऊ आणि संभाळून काय ठेवणार तर एक लाखाचे पंचाहत्तर हजार झालेत तो फंड! का तर त्याच्यात नुकसान झालंय ना….तो जो पर्यंत प्रॉफिट मध्ये दिसत नाही तोवर सांभाळणे आणि हा आपला मानसिक हिशोब लाखात येऊ नये म्हणून त्यावर लॉंग टर्म आहे असा शिक्का मारून ठेवता…जो फंड वाढला तो लॉंग टर्म न्हवता का?….पण अजून एक उदाहरण घेऊन ह्याकडे पाहूया.

 

समजा तुमच्या मित्राला दोन मुलं आहेत एक अतिशय हुशार आणि प्रामाणिक आहे. घरासाठी खूप राबतोय आणि घर अधिक जोडून ठेवतोय!

दुसरा मात्र अगदीच नशेत गडून असतो, जुगार खेळून पैसे उडवतो, दारू पिऊन घरी तमाशे करतो!

एक दिवस तुम्हाला फक्त इतकंच कानावर येतं तुमच्या मित्राने एका मुलाला घरा बाहेर काढलं.

काय वाटतं तुम्हाला कोणाला काढलं असेल? 

अनेक जण म्हणतील की दारुड्या वाया गेलेल्या मुलाला! 

मात्र गुंतवणुकी बाबत मात्र अनेकजण गुणी मुलाला बाहेर काढायला बघतात आणि जो घरचे पैसे वाया घालवतोय ते पाहूनही त्याला सांभाळत बसतात! लॉस मध्ये नाही विकायचे म्हणत…मात्र त्या मागील करण समजून न घेता लॉस करणाऱ्या गोष्टी लॉंग टर्म होल्ड करून लॉस मोठा आणि अधिक मोठा होत जातो! लॉंग टर्म हा प्रॉफिट मोठा करण्यासाठी होल्ड करणे हे खरे पेशन्सचे काम आहे.

 

हे का होतं तर मानसिक हिशोब! हा मानसिक हिशोबीपणाच खूप आडवा येतो गुंतवणूकदार आणि यशस्वी आर्थिक निर्णया मध्ये! 

 

आर्थिक निर्णय हे भावनिक होऊन किंवा मानसिक हिशोब करत घेणे योग्य होणार नाही!

आणखी एक उदाहरण देतो, क्रेडिट कार्ड! “फुकट आहे…ठेवा तुमच्याकडे कधीतरी येईल कामी” म्हणत, आपली बँक आपल्याला मागे लागून एक तरी क्रेडिट कार्ड ठेवायला लावते! 

हे क्रेडिटकार्ड वापरून तुम्हाला काही ऑफर ही मिळतात, असे प्रलोभन दिसत राहते…आपण आणखी खुश होतो आणि सर्वसामान्य अनुभव असे सांगतो की जास्तीतजास्त लोक क्रेडिट कार्डने शॉपिंग करायला गेले तर जास्त खर्च करतात! जे की त्यांनी रोख पैसे देऊन सामान नसतं घेतलं, तेही ते क्रेडिट कार्डाच्या साहाय्याने सहज विकत घेऊन टाकतात! ह्याच कारणाने ह्या ऑफर ही दिल्या जातात की तुम्हाला ते वापरायची सवय लागावी! एकदा तुम्ही त्या चक्रात अडकलात! 

 

की जे काही व्याज क्रेडिट कार्डच्या बिलावर लावत राहिलं जातं, ते अभूतपूर्व असतं! काहींनी त्याचा अनुभव घेतलाही असेल. तुमचा मानसिक हिशोबीपणाच्या ह्या पैलूंचा व्यवस्थित वापर करून घेत तुम्हाला क्रेडिट कार्ड ही दिलं जातं!

 

दहातले सहाजण तरी त्याचा कधीना कधी वापर करतात, त्यातून अतिरिक्त गोष्टी विकत घेऊन ही पैसे कमावले जातातच, पण त्यातले दोन जण जरी क्रेडिट कार्ड वापराची सवय लागणारे मिळाले, तरी बँकेला भरपूर व्याज कमाई होते! 

हे का होते? हाच मानसिक हिशोब की मी माझे पैसे खर्च करत नाहीये बँकेचे करतोय ही त्या क्षणी सुखावह वाटणारी भावना देऊन तुम्हाला तात्काळ खर्च करायला लावणे. क्रेडिट कार्डचे असो किंवा माझ्या अकौंटवरचे पैसे असो…मी माझेच पैसे खर्च करतो आहे ह्याची भान निर्माण व्हायला हवे. हे भान समजून घ्यायला ही मामका..पांडवा हा भेद जसा धृतरष्ट्राने केला तो टाळायला हवा. असा भेद करून आपण आर्थिक निर्णय आणखी कुठे घेत असतो? चला पाहूया…

 

माझ्या मित्राच्या शेजारी राहणार दहा वर्षाचा मुलगा वडिलांकडे, फार हट्ट करत होता, की “मला मुंबई इंडियन्सचा युनिफॉर्म हवा आहे!” अगदी हुबे-हुब मुंबई इंडियन्सचा क्रिकेट टीमचा ब्रँडेड पोशाख चार हजार रुपयाला होता! त्याचे वडील अजिबात तयार न्हवते. ते म्हणत होते की क्रिकेटचं खेळायचय किंवा पहायचय ना! तर छान पांढरा टीशर्ट-पॅन्ट असा टेस्ट क्रिकेटचे कपडे घेतो की! किती छान दिसशील त्यात, ते दीड हजारात मिळत होते, पण मुलाला मात्र मुंबई इंडीयंसचाच युनिफॉर्म हवा होता… क्रिकेट मॅच पाहण्यासाठी!

त्यांना चार हजार रुपये या गोष्टीसाठी खर्च करणे योग्य वाटत न्हवते. ते मुळीच तयार न्हवते.ह्या गोष्टीसाठी. इतके पैसे खर्च करणे त्यांना पटत न्हवते.ते रोज समजावणार आणि हा मुलगा काही ऐकणार नाही हे रोजच चालू होतं! 

नेमका तो महिना असतो अधिक महिना आणि ह्यांना बायकोच्या माहेरी जेवायला बोलावलेल असतं, हा मुलगा मात्र रुसल्यामुळे काही जात नाही आणि शेजारी खेळायला येतो त्याचं आपलं एकच चालू होतं, मला मुंबई इंडियन्सचा युनिफॉर्म घालूनच मॅच पहायची आहे! माझा मित्र व त्याचा घरचेही त्याला समजावतात, की तो पोशाख किती महाग आहे. तेवढ्या पैश्यात, तुला असे तीन ड्रेस घेता येतील एक महिना आय पी एल झाली की मग काय करणार तू ह्या कपड्यांच! तुला रोज खेळायला जायला हे पांढरे कपडे छान होतील किंवा अगदी तू त्यात क्रिकेटचं किट ही घेऊ शकशील! त्याला क्रिकेट किट ही कल्पना फार वाढते. आम्ही त्याचा वडलांना फोन करून सांगतो. त्याला आता त्याच पैश्याच महत्व पटलय आणि तो त्या युनिफॉर्म ऐवजी क्रिकेटचं किट घ्यायला तयार झाला आहे. त्याच वडिलांना खूप आनंद होतो. मी जे इतके दिवस समजावतो आहे, ते आपल्या मुलाला पटल आहे!.रात्री माझ्या मित्राचा मला फोन येतो अरे त्याला पटलेलं खरं सगळं पण रात्री तो मुंबई इंडियन्सचा पोशाख आणि त्यावर क्रिकेटच हेल्मेट पासून,पॅड, बॅट असा बॅट्समन होऊन आला आम्हाला दाखवायला!….आम्ही आवक!

 

त्याचे वडील माझ्या मित्राचे चांगले मित्र, ते म्हणले मित्राला म्हणाले ” अरे अधिक महिन्याचे सासर्यानी दहा हजार रुपये दिले! मग म्हटलं का ह्याला ही इतकं अडवून ठेवा, इतके देतील मुळीच वाटलं न्हवतं रे! मग बायकोही म्हणाली घेऊया का त्याला?  मग के दोन्ही घेऊन दिलं!”

 

हा ही एक प्रकारचा मानसिक हिशोबच नाही का? त्यांनी पैस्या- पैस्यात फरक केला, त्यांनी हे पैसे तर सासऱ्यांचे आहेत,सासर्यानी दिल्यावरही, त्यांनी ते त्यांचे मानले नाहीत, आणि म्हणून मनाला पटत नसतानाही त्यांनी ते पैसे खर्च करून टाकले,कारण की “हे कुठे आपल्या मेहनतीचे पैसे आहेत!” आपल्या मेहनतीच्या पैश्यानी मुलाचे हे लाड ते पुरवायला तयार न्हवते पण सासर्यांच्या पैश्यानी मात्र पुरवण्यात त्यांना काहीही वाईट वाटले नाही!

हे काही कोग्निटिव्ह ट्रेटस आहेत ह्यावर नीट समजून उमजून काम करून ह्या गोष्टी काढून टाकल्या शिवाय यशस्वी गुंतवणूकदार ही होता येणे शक्य नाही, कारण हेच कोगिंटिव्ह सेटअप,गुंतवणूक निर्णय घेतानाही वापरले जाणारे आहेत त्यामुळे मुळात ही प्रवृत्ती आपल्यातून काढून टाकणे हाच ह्यावर उपाय आहे.

 

ह्या प्रकारचा मानसिक हिशोब करणारा माणूस, जो पर्यंत मानसिक हिशोब करणे थांबवत नाही तोवर यशस्वी गुंतवणूकदार ही कसा होईल? ह्या विचाराच्या व्यक्तीला मार्केटने मिळवून दिलेला परतावाही सासर्यानी दिलेल्या पैस्यासारखाच वाटणार..आपण कुठे काही केलंय त्यासाठी!…ह्या भावनेने तो रिटर्न्स कडे पाहिलं तर गुंतवणूकदार म्हणून मोठे यश शक्यच नाही!

 

गुंतवणुकीसाठी ह्या प्रकारचा विचार करायची पद्धत जी माणसाचा सहाजिक स्वभाव आहे मात्र ती हानिकारक आहे! त्यात बदल करणे गरजेचे आहे.

ह्यासाठी गुजराथी-मारवाडी लोक पहा, एक रुपयाच नाणं त्यांना रस्त्यात जरी पडलेलं मिळालं तरी ते डोक्याला लावतील, त्या नाण्याला वंदन करतील, त्या मागची त्यांची भावना काय असते? ‘तर ही लक्ष्मी आहे.’ तिचा सन्मान केला पाहिजे! कोणाकडूनही का असेना हे नाणं रस्त्यात पडलं म्हणजे लक्ष्मीचा अवमान झाला आहे! त्या बाबत ते लक्ष्मी देवतेची माफी मागतात..यथोचित सम्मान देतात, भले ते त्यांनी कमावलेला रुपया नसला तरी! 

 

ते मी कमावलेला किंवा रस्त्यात कोणाचा मिळलेला सगळी नाणी हे लक्ष्मी देवतेचा प्रसाद आहे मानतात, ते त्या पैस्या पैस्यात फरक करत नाहीत! साहजिकच ह्या स्वभावामुळे त्यांच्यावर लक्ष्मी देवता प्रसन्न होण्याची शक्यता जास्त असते.

 

मित्रांनो रिचर्ड थॅलर ह्या नोबेल पारितोषिक विजेत्या महान अर्थ-मानसशासत्रज्ञाने माणसाला त्याचा आर्थिक वर्तना बाबत हे दाखवून दिलेलं आहे. ही भूमिका जर समजून घेऊन पैस्या-पैस्यात फरक करण जितकं टाळू, तितके आपले आर्थिक निर्णय हे यशस्वी ठरून लक्ष्मी देवता आपल्यावर सदैव प्रसन्न राहील.

 

मात्र हे करणे सोपे जरी वाटत असले तरी फार फार म्हणजे फारच कठीण आहे. 

 

एखाद्या प्रसंगी आपण रेस्टॉरंट मध्ये जात असू तर आपण मागवत असलेले पदार्थ आणि मित्र पार्टी देत असेल तर आपली ऑर्डर बदलते का? 

कंपनी खर्चाने बिझनेस ट्रिप वर जाताना आणि स्व खर्चाने जाताना आपले आर्थिक वर्तन बदलते का? आपण मोहात येऊन दुसऱ्याचे पैसे आणि आपले पैसे ह्यात भेद निर्माण करण्याची एकही जागा रिक्त सोडत असू तरी आपण हे कौशल्य पूर्णपणे आत्मसात केलेले नसेल….यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी स्थितप्रज्ञा व्हवेच लागेल.

 

अनेक डॉक्टर्स हे फार्मा कंपनीने तिकीट मिळणार असेल तर बिझनेस क्लासने जातात आणि स्व खर्चाने जायची कधी वेळ आली तर इकॉनॉमी! ही मुळात मुफ्त का चंदन घीस मेरे नंदन! प्रवृती आहे ती ह्या मेंटल अकाउंटींगचेच मूळ आहे. हे मूळ जोवर नष्ट होत नाही. सर्व पैसे हे लक्ष्मी देवतेचे आहेत मग ते माझ्या खिशातले असो किंवा कोणाच्याही खिशातले मी त्याचा सन्मानच करेन. योग्य तिथे सढळ हाताने खर्च करेन, आणि अयोग्य खर्च कोणाचाही पैशाचा होऊ देणार नाही. ही भावना मनात असेल तर माणूस ह्या मेंटल अकाउंटिंग पासून आपले रक्षण करू शकेल आणि मुळात धृतराष्ट्र होणारच नाही. कार्यकृत्त्ववान नारायण होईल लक्ष्मी त्याची अर्धांगिनी होईल. 

त्यामुळे माझी मुले आणि पांडूची मुले नाही तर आपली मुले म्हणून पाहत राज्य हिताचे निर्णय घेणे हे आपल्याला गीतेचा पहिला श्लोक शिकवतो, तो आपण गुंतवणुकीत मेंटल अकौंटिंग टाळावे ह्यासाठी समजून घेतल्यास आपला मानसिक पाया भक्कम होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *